Zero Hour | वक्फ, ठाकरे आणि हिंदुत्व; भाजप Vs ठाकरे गटात पुन्हा जुंपली
दिवसभरातल्या महत्वाच्या बातम्या : 03 April 2025
मुंबई : देशात सध्या वक्फ बोर्ड विधेयकावरुन (Waqf board) घमासान सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आहेत. त्यातच, राज्यात शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये या विधेयकाच्या पाठिंब्यावरुन जोरदार खडाजंगी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या विधेयकाच्या मुद्द्यावरुन हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत ठाकरेंना डिवचलं आहे. त्यानंतर, आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचा खरा चेहरा उघडा पडला, आमचा विधेयकास विरोध नसून विधेयकाच्या आडून होणाऱ्या भ्रष्टाचाराला विरोध असल्याचे म्हटले. तसेच, गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही जोरदार टीका केली. मात्र, लोकसभेच बहुमताच्या जोरावर हे विधेयक मंजूर झाले असून राज्यसभेत आज विधेयकावर चर्चा सुरू आहे. राज्यसभेतही शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार संजय राऊतांनी या विधेयकावरुन भाजप नेत्यांना सुनावलं आहे. कदाचित, राज्यसभेत आज या विधेयकावर मतदान होईल. मात्र, महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad pawar) या विधेयकाच्या मतदानावेळी गैरहजर असणार आहेत. राज्यसभेत वक्फ विधेयकावर चर्चा सुरू असताना खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संजय राऊत म्हणाले, "तुम्ही (भाजप) खुश दिसत आहात, पण मुसलमानांची इतकी काळजी तर पाकिस्तानच्या मोहम्मद अली जिन्नांनाही नव्हती. जिन्नांचा आत्मा उठून तुमच्यात बसला आहे का?" त्यांच्या या टीकेमुळे सभागृहात गोंधळ उडाला. त्यामुळे, या विधेयकास शिवसेनेनं सभागृहात विरोध केला असून मतदानही विरोधातच केलं आहे. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आता राज्यसभेत आज मतदान होऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचीच राज्यसभेतील वक्फ सुधारणा विधेयकाच्या मतदानावेळी गैरहजेर राहणार आहे. बुधवार आणि गुरुवारी शरद पवार मुंबईत असल्याची शरद पवारांच्या कार्यालयाची माहिती आहे. उद्या शरद पवार दिल्लीसाठी रवाना होणार, बुधवारी वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मांडलं गेल आणि या बिलावर चर्चा होऊन उशिरा रात्री हे बिल लोकसभेत पारित झालं आहे.